Mar 29, 2011

कम्युनिकेशन

खाद्या ब्राह्मण कुटुंबातल्या माणसांचं एकमेकांशी असणारं कम्युनिकेशन-संवाद आणि बहुजन समाजातल्या एखाद्या घरातलं कम्युनिकेशन यातला फरक... बहुजन समाजातल्याच पण शहरात राहणा-या नोकरदार कुटुंबातली संवादक्रिया आणि खेड्यात राहणा-या शेतकरी कुटुंबातली संवादक्रिया याची तुलना....मी कॉलेजमध्ये शिकायला असताना अनेक गोष्टींवर विचारांची चक्रं चालू असायची डोक्यात त्यातला हा एक आवडता विषय. नात्यांचे पीळ, गुंतागुंत, कुटुंबातला मोकळेपणा, संवादाची भाषा, शिक्षण, व्यवसाय-नोकरी, आर्थिक स्थिती, शिकणारी कितवी पिढी, राजकीय प्रक्रियेतलं स्थान आणि प्रभाव, भवताल, सभोवतीचं पर्यावरण, स्वतःला व्यक्त करण्याच्या पधद्ती आणि कौशल्यं, परंपरने दिलेलं भान आणि शहाणपण, जगण्याचं त्यांचं म्हणून एक तत्त्वज्ञान इत्यादी असंख्य मुद्दे जोखत या संवादप्रक्रियेचा थांग लावण्याचा कळत-नकळत प्रयत्न सुरू असायचा. अर्थात हे सगळं खूप विचारपूर्वक करत होतो असं नाही तर अनेक तुकड्या-तुकड्यांत विचार सुरू असायचा आणि त्यातून एखादा धागा सापडत जायचा.

खरं तर कॉलेज संपल्यानंतर पत्रकारितेत आल्यावरच मला सर्वसाधारण शेतकरी समाजाबद्दलचं नेटकं आकलन व्हायला सुरूवात झाली. शेतमालाला रास्त भाव न देण्याच्या आपल्या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी समाज एक प्रकारच्या शोषणाच्या वरवंट्याखाली कसा भरडला जात आहे, याची धारदार जाणीव `शेतकरी संघटने`मुळे होत गेली. स्वातंत्र्योत्तर काळातलं एकूणच शेतीचं धोरण `भारता`तल्या शेती व शेतक-यांचं शोषण करून  `इंडिया`तल्या शहरी-मध्यमवर्ग-नवश्रींमंत-अतिश्रीमंत लोकसंख्येच्या हिताची काळजी वाहणारं आहे; कारखानदारीला स्वस्तात कच्चा माल मिळावा यासाठी शेतीमालाला उत्पादनखर्चाइतकाही रास्त भाव न देणं हा या धोरणाचाच भाग आहे, या संघटनेच्या एकूण मांडणीमुळे माझा पर्सपेक्टिव्ह खूपच बदलला. कॉलेजमध्ये असताना इकॉनॉमिक्सच्या एका अभ्यासाचा भाग म्हणून एखाद्या पिकाचा `कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स`निहाय संपूर्ण उत्पादनखर्च काढणे हा केवळ `एकेडेमिक एक्झरसाईज` होता. त्यात शेतक-याच्या श्रमाचे मूल्य लिहिताना त्याच्या शोषणाच्या मात्रेचाही तो एक आकडा आहे हे त्यावेळी मला कधी कळलंच नव्हतं. स्वतःचे श्रम खाऊन पोटापुरतं पिकत असल्याने शेतीच्या बेडीतून बाहेर न पडू शकणा-या शेतकरी समाजाबद्दलची जाणीव नंतरच्या काळातच थोडीफार स्पष्ट होत गेली.

स्वतःच्या शेतात गुरांबरोबर आणि एक प्रकारे गुरांसारखंच राबत असताना आणि या शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्गही समोर दिसत नसताना या शेतक-याची संवादाची कृती आणि प्रक्रिया कशी असेल, हा प्रश्न पुन्हा सतावू लागला. या शेतकरी कुटुंबातलं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं, कामाच्या जोखडात-रगाड्यात बांधून घेतल्यावर स्वतःला व्यक्त करणं, मन मोकळं करणं त्यांना साधतं का, कम्युनिकेशन गॅपमुळे त्यांची कुचंबणा कशी होते, भावनांचे कढ निःशब्दपणेच व्यक्त होतात याकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करत होतो. जागतिकीकरणानंतर संपूर्ण भवतालाचं चित्रच पालटून गेलेलं असताना आणि तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे टीव्ही, मोबाईल इत्यादी साधनांचा सुळसुळाट झालेला असताना एकीकडे खेड्याबाहेरच्या जगातले समृध्दीघन बदल त्यांना रोजच दिसणं-अनुभवणं शक्य झालं आणि त्याचवेळी स्वतःच्या आय़ुष्यातल्या अभावग्रस्त, कोरड्या दिवसांचा हिशोब मांडत असताना या दोन्हीची ते सांगड कसे घालत असतील हा प्रश्न मला अस्वस्थ करून टाकतो. टीव्हीमुळं आख्खं जगच घरात आलेलं असताना टीव्हीच्या पडद्यावरील रंगी-बेरंगी प्रतिमांच्या माध्यमातून अंगावर येणारं शहरकेंद्रीत सुखलोलूप जगण्याचं चित्र पाहताना ते आपल्याला अप्राप्य आहे असं वाटून ते निराश होत असतील की त्या हलत्या प्रतिमांच्या जगाचा आपल्या आयुष्याशी सांधा कसा जुळत नाही ही जाणीव त्यांना आतल्या आत पोखरत असेल? टीव्हीच्या पडद्यावरचं जग आणि स्वतःच्या सभोवतीचं जग यातलं अंतर जाणवून त्याला ते कसे रिएक्ट होत असतात? शेतकरी कुटुंबातल्या पौगंडावस्थेतील मुलांचं भावविश्व बदलत्या काळाच्या पार्श्वभुमीवर नक्कीच उलटं-पालटं होत असणार. त्याची दखल कुठं घेतली जातेय का? शहरात शिक्षणाच्या निमित्तानं राहून आलेल्या पण तिथं नोकरीची संधी न मिळाल्याने परत गावाकडे येऊन शेतीला जुंपल्या गेलेल्या तरूण मुलांचा एक वेगळा वर्ग आहे आणि त्यांचे स्वतंत्र प्रश्न आहेत. त्यांना त्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी, मनातल्या खळबळीचा निचरा करून देण्यासाठी खेड्यातल्या कम्युनिकिकेशनच्या सिस्टीमध्ये काही आऊटलेट आहे का, हा सुध्दा एक मोठाच मुद्दा आहे.

मोबाईल खेड्या-पाड्यांत पोहोचल्यामुळे तिथल्या लोकांचं एकमेकांशी असणारं कम्युनिकेशन प्रचंड वाढलं आहे असं मानणं मला खूपच वरवरचं आणि अपुरं वाटतं. मोबाईल हे कम्युनिकेशनचं एक साधन आहे; पण ते साधन आणि संवादाची प्रक्रिया या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शेतक-याचं बाहेरच्या लोकांशी बोलणं वाढलं असेल कदाचित मोबाईलमुळे पण त्याचा कुटुंबातल्या लोकांशी संवाद वाढलाय याबद्दल मला तरी शंका वाटते. कारण संवाद ही प्रक्रिया केवळ साधनापुरती मर्यादित नाही. संवाद या संकल्पनेचा अवकाश खूप मोठा आणि व्यापक आहे. शेतकरी सध्या काय प्रकारचं आयुष्य जगतोय, त्या जगण्याच्या प्रेरणा, त्यातले ताण, विळखे, हर्ष-आनंद याचं शेअरिंग घरच्या लोकांबरोबर करता येईल असं काही पर्यावरण समाजव्यवस्थेत सध्या आहे का, हा खरा मुद्दा आहे. शेतीला किफायतशीर धंदा न बनू देण्याची व्यवस्था करून शेतक-याचं सुख, स्वस्थता, स्वास्थ्य आणि उसंत आपण हिरावून घेतलीय आणि त्यामुळे त्यांच्या कम्युनिकेशनमधला प्राणही आपण काढून घेतलाय हे वास्तव आपल्याला नाकारता येईल का?

`बापाचे कम्युनिकेशन` या कवितेत बालाजी इंगळे हा कवी म्हणतोः

वावरात कुळवत असणा-या
बापाच्या डोक्यावर पसरलेलं असतं
असंख्य मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचं जाळं
बाप मात्र कामाच्या धबडग्यात
बाजूच्याच तुकड्यात खुरपणा-या आईला
दिवस दिवस बोलू शकत नाही  

1 comment: