शेतक-यांच्या जगण्याकडे पाहण्याची सर्वसाधारण शहरी जाणीव कशी असते हा माझा नेहमीच कुतुहलाचा, औत्सुक्याचा आणि बहुतांश वेळा चीड आणणारा विषय राहिला आहे. एक तर शेतक-यांना दिले जाणारे पॅकेजेस, कर्जमाफी वगैरेंकडे उपकाराच्या भावनेतून पाहत एवढं सगळं दिलं तरी यांची स्थिती काही सुधारत नाही, सगळं फुकटात लाटतायत अशी एक अज्ञानातून आलेली मूर्ख प्रतिक्रिया सर्रास आढळून येते. दुसरा एक वर्ग असा असतो की त्यांना सतत असं वाटतं की एका दाण्यातून हजार दाणे करण्याची क्षमता असणारा शेतीचा उद्योग तोट्यात जातोच कसा, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, त्यामुळे त्यांची शेती आतबट्ट्याची होते, हा त्यांचा लाडका सिध्दांत असतो. या लोकांना शेतीच्या बाजारभावाचं गणित माहित नसतं की कारखानदारीला कच्चा माल स्वस्तात मिळावा यासाठी शेती तोट्यातच राहायला पाहिजे हे सरकारनंच स्वीकारलेलं धोरण आहे, याचीही सुतराम कल्पना नसते. शेतक-यांकडे नेहमी दयाबुध्दीने आणि करूणेने पाहणारा आणखी एक वर्ग असतो. सिग्नलवर भीक मागणा-या लहान मुलांकडे पाहण्याचाही त्यांचा तोच दृष्टिकोन असतो. खरं तर स्वतःची मुळं हरवून बसलेल्या, कायम एक गिल्ट घेऊन जगणा-या महानुभवांची ती वांझोटी आणि अवास्तव कणव असते.
खेड्यातल्या लोकांच्या जगण्याची धग, आयुष्यातले ताण, पीळ आणि ताणे-बाणे याचं नीट आकलन होण्यासाठी एक स्वच्छ दृष्टी आणि मोकळं-संवेदनशील मन असलं पाहिजे. याचा अर्थ खेड्यात सगळे साधु-संतच राहतात असा मुळीच नाही. (शहरातल्या काही लोकांचाच तोही एक गैरसमज.) जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींचं दर्शन तिथंही होतंच. तिथंही बेरकी, दुष्ट, खलप्रवृत्तीची, क्रूर इत्यादी लोकं असतातच. तो वेगळा विषय आहे. पण मुळात डोळ्यांवर झापडं बांधूनच शहरी जाणीव खेड्याकडे बघते आणि आपल्याला बघायला जे आवडेल तेच तिकडं शोधते, हा माझा मुद्दा आहे. सर्वसाधारणपणे या शहरी जाणीवेचा लसावि काढला तर शेती आणि खेडी यांच्याबद्दलचा एक रोमॅन्टिसिझम त्यांच्या मनात किती खोलवर नांदतोय याची प्रचीती येते. खेड्यामधले घर कौलारू.... माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहतं.... असं जे चित्र त्यांच्या मनात असतं ते मला एकंदर कचकडयाचं आणि बेंगरूळ वाटतं. कधीतरी विकेंडला पिकनिक म्हणून शेतात जाणं वेगळं आणि खेड्यात राहून शेतकरी म्हणून शेती करणं वेगळं यातला भेद त्यांच्या लक्षात येत नाही हे त्यांचं अज्ञान मानायचं, आकलनाची मर्यादा म्हणायची की दांभिकपणा हा प्रश्न मला पडतो. शेतात डोलणारं भरगच्च पीक बघितलं की शहरी लोकं हरखून जातात आणि त्यांना एक प्रकारचा जो रोमॅन्टिक आनंद होतो, तसा प्रत्यक्ष शेतक-याला होत नाही. कारण या पिकाची बाजारात काय वासलात लागणार, काय भाव मिळणार ही काळजी त्याला खात असते.
शेतीधंदा आतबट्ट्याचा का होतो, शेतक-यांना उत्पादनखर्चाइतकाही रास्त भाव का दिला जात नाही याचं मूलगामी अर्थशास्त्रीय निदान करताना `शेतकरी संघटने`च्या शरद जोशींनी `भारत` आणि `इंडिया` अशी मांडणी केली आहे. `इंडिया`तल्या लोकांना समृध्द जीवन देण्यासाठी `भारता`तल्या शेतक-यांचं आर्थिक शोषण केलं जातं आहे हे त्यांनी ठामपणे मांडलं. शेतीकडे बघण्याच्या शहरी जाणीवेचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा शरद जोशींची ही मांडणी मला एक खूप मोठा पट उलगडून सांगत असते.
एकूण शेतकरी, खेडं यांच्याकडे बघण्याचा शहरी दृष्टिकोन असा अडाणचोटपणाचा असल्याने ग्रामीण भागात जी स्थित्यंतरं होत आहेत, होऊ घातली आहेत, त्याकडेही बघण्याची शहरी नजर अशीच कातावून टाकणारी असते. एकाच वेळी तिची गंमतही वाटते आणि ती आक्षेपार्हही वाटते. बरं जी माणसं शहरातच जन्मली, वाढली त्यांची ही त-हा एकवेळ समजून घेता येईल पण ज्यांची नाळ खेड्याशी जोडलेली आहे, तिथून नोकरी-धंद्याच्या निमित्तानं जी लोकं शहरात स्थाईक झाली किमान त्यांच्या जाणीवेला तरी संवेदनांचा पदर असावा की नाही? ती लोकं पण फालतू नॉस्टेलजियाला आळवत आमच्या लहानपणी अमुक होतं आणि आता मात्र तमूक झालं अशी `कृष्णाकाठी कुंडल आता पहिलं उरलं नाही` छापाचे गळे काढत असतात, त्याचा अक्षरशः वीट येतो. खेड्यांमधल्या स्थित्यंतराचा नेमका अवकाश काय आहे, त्या अपरिहार्यतेमागची कारणं काय आहेत, त्यांना सामोरं जाताना ग्रामीण समाजमनाची स्थिती कशी आहे, तंत्रज्ञानाच्या वारूवर स्वार झालेल्या वेगाने बदलणा-या भवतालाला ते कसा प्रतिसाद देतायत, त्यातून काय सकारात्मक आणि नकारात्मकही बदल घडून येतायत, नव्या चौकटीत मूल्यव्यवस्थेची भाषा आणि रचना बदलतेय का..... असे असंख्य प्रश्न का पडत नाहीत आपल्याला?
`धूळपेरणी ` आणि `असं जगणं तोलाचं ` या पुस्तकांचे लेखक आणि शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रा. शेषराव मोहिते यांनी एका ठिकाणी खूप मार्मिक लिहिलं आहे, ते मला या संदर्भात विचार करताना महत्त्वाचं वाटतं त्यामुळे येथे उध्दृत करतो. मोहिते लिहितातः ``(खेड्यात होणा-या) या बदलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायचा? `जुनं ते सोनं` असाच. जेव्हा विहिरीवरली मोट गेली आणि इंजिन आले, तेव्हा मोटेवरली गाणी गेली म्हणून आपण किती विव्हळलो! अनेक कथा-कादंब-यातून ते उसासे उमटले. पण जेव्हा मोट होती तेव्हा बैलाचे काय हाल होते. शिवळ खांद्यात रूतून सतत बैलाचे खांदे फुटायचे, त्यातून रक्त गळायचे, मांस बाहेर यायचे, कावळे चोच मारून बैलाचा जीव नकोसा करायचे, डोळे गच्च मिटून त्या वेदना सहन करताना त्या बैलांकडे शेतकरी उघड्या डोळयांनी पाहू शकत नसत. तरीही आमच्या साहित्यिकांना दुःख कशाचे तर ते मोटेवरले गाणे आता ऐकायला मिळत नाही याचे. हेच जात्यावरल्या ओव्यांविषयी. पहाटे तीन-चार वाजता उठून जाते ओढताना पोटातील आतडे गोळा झाले म्हणजे आया-बाया ती वेदना विसरण्यासाठी गाणी म्हणत. पिठाची गिरणी आली आणि या हजारो वर्षाच्या जाचातून स्त्री सुटली, पण आपणास दुःख ते ओवी हरविल्याचे.
मळ्यात इंजिन जेव्हा येते तेव्हा ते स्वतःचे एक भावविश्व घेऊन येते. पिठाची गिरणी आली आणि तिच्या आवाजाने खेड्याचा आसमंत एका वेगळ्या लयीने, आवाजाने भरून गेला, तिकडे आपण पाहत नाही. काय आले त्याचे नीट कौतुक होत नाही आणि काय गेले त्यासंबंधी मात्र चुकीच्या पध्दतीने उमाळे दाटून येणं हे फारसं शहाणपणाचं लक्षण नाही. प्रामाणिकपणाचेही लक्षण नाही.``
हे भाष्य पुरेसे बोलकं आहे, नाही का?
श्री.कबीर
ReplyDeleteछान मांडणी झाली आहे. धन्यवाद.
mast eakdam
ReplyDeleteKhedyatlya lokanchya vedna janun tya drushtine paul uchalale tar sarv sarthaki lagle. Chaan lekh aahe
ReplyDelete