Jun 5, 2011

गरज पर्यावरणस्नेही शेतीची...

शेती हा मूलतः निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेला `उद्योग` आहे. जंगलात शिकार करत फिरस्तीचे जिणं जगणा-या मनुष्यप्राण्याला फळ खाऊन फेकून दिलेल्या बियांपासून नवीन रोप उगवल्याचं पाहून शेतीचा शोध लागला आणि सिव्हिलायजेशनच्या एका नव्या पर्वाला सुरवात झाली. स्वतःच्या गरजा आणि जीवनपध्दतीचा विचार करून मनुष्याने शेतीचं तंत्रज्ञान विकसित केलं त्यावेळी मात्र निसर्गाच्या विरोधी भूमिका घेणं त्याला भाग पडलं. शेतीमध्ये एका पिकाखाली सलग क्षेत्र असतं तसं मोनोकल्चर निसर्गात नसतं. निसर्गात वेगवेगळ्या जाती-प्रजाती, उंची-वयाच्या वनस्पती आढळतात. सूर्यप्रकाश आणि पोषणतत्त्वांची उपलब्धता लक्षात घेऊन त्यांचा वेगवेगळ्या स्तरांत पुरेपूर वापर होईल, अशी व्यवस्था असते. एखाद्या जीवाची-वनस्पतीची प्रमाणाबाहेर वाढ होत असेल तर त्यावर नियंत्रणासाठी त्याच्या भक्षक जीवाची योजना निसर्ग करतो. निसर्गात डोंगर, नदी, वाळवंट, खोरं अशा अनेक पर्यावरणीय व्यवस्था असतात. शेतीमध्ये मुख्यतः मोनोकल्चर हेच प्रयोजन असल्याने पर्यावरणीय व्यवस्था विस्कळित होत असते.

शेती ही जरी निसर्गाच्या विरोधातली कृती असली तरी, निसर्गाचे सगळेच नियम धुडकावून, निसर्गावर मात कऱण्याच्या उद्देशाने शेती केली तर त्याचे दीर्घकालिन दुष्परिणाम होतात. ते शेवटी शेतीच्याच मुळावर येतात. त्यामुळेच शेती ही पर्यावरणस्नेही आणि निसर्गाशी सुसंगतच राहायला हवी, तरच ती शाश्वत होऊ शकेल. थोडक्यात नियमांना थोडी बगल देऊन शेती करावी लागते; नियम पायदळी तुडवून नव्हे, ही यातली निसरडी रेषा आहे. अब्जावधी लोकांच्या अन्नाची गरज भागवायची तर मोनोकल्चर पूर्णपणे टाळता येणार नाही. पण तरीही शक्य तिथं मिश्रपीकपध्दतीचा अवलंब करणं पर्यावरणाशी सुसंगत ठरेल. मिश्रपिकांमुळे जमिनीतील पोषणद्रव्ये शोषून घेण्याचा आणि जमिनीला ती दुस-या स्वरूपात परत देण्याचा तोल नीट सांभाळता येतो. सरकार मात्र नगदी पिकांच्या मोनोकल्चरला प्रोत्साहन देत असल्याने त्यासाठी आवश्यक महागडी संकरित बियाणे, खते-औषधे, पाणी यासाठी अनुदान मिळतं. त्यामुळे सुरवातीला किफायतशीर वाटणारी ही शेती नंतर मात्र वाढत्या उत्पादनखर्चाच्या दुष्टचक्रामुळे न परवडणारी होते. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणावर शोषण होतं. पर्यावरणावर घातक परिणाम होतात. सरकारी धोरणांमुळे पुढं रेटलं जाणारं मोनोकल्चर आणि मिश्रपीकपध्दती यांचा तोल सांभाळणं पर्यावरणासाठी गरजेचं आहे.

पिकावर रोग-कीड आली म्हणजे रासायनिक औषधं वापरून त्यांचा समूळ नायनाट करायचा ही रोग-किड नियंत्रणाची पध्दत आपल्याकडे सर्रास वापरली जाते. त्याचे निसर्ग-पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होतात. वास्तविक रोग-कीड ही निसर्गाच्या नियंत्रण यंत्रणेचं चिन्ह असतं. मोनोकल्चरमध्ये एकाच वनस्पतीची प्रमाणाबाहेर संख्या वाढू नये यासाठी केलेली ती व्यवस्था असते. निसर्ग रोग-कीडींचं व्यवस्थापन करतो. त्यामुळेच पिकसंरक्षणासाठी नियंत्रणाऐवजी रोग-कीड व्यवस्थापन ही पध्दती पर्यावरणस्नेही ठरते. रोग-किडींची संख्या एका विशिष्ट पातळीपर्यंतच कमी करायची, ते पूर्ण नष्ट करण्याची गरज नाही, हे तत्त्व त्यात वापरलं जातं. समजा एका पिकाच्या झाडावर पन्नास किडे आहेत. त्यातले तीस किडे नष्ट केले असता पिकाला असणारा धोका संपत असेल तर बाकीचे वीस किडे जिवंत ठेवायचे. याला इकॉनॉमिक थ्रेशहोल्ड लेव्हल (ईटीएल) म्हणतात. उरलेल्या किड्यांचा पिकाला धोका तर होत नाहीच उलट हे किडे ज्या इतर किड्यांना खाऊन जगतात त्या भक्ष्य किड्यांची संख्या नियंत्रणात राहते आणि त्याचा पिकाला फायदाच होतो, असे निरीक्षण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञ डॉ. सर्जेराव पाटील नोंदवतात.

एकच पीक वर्षानुवर्षे घेतलं तर रोग-किडींसाठी यजमान पीक (होस्ट) खात्रीने उपलब्ध होत असल्याने प्रादुर्भाव वाढतो. या पिकांचा फेरपालट केला तर रोग-किडींचं नैसर्गिक व्यवस्थापन होतं. मुख्य पिकाच्या चारी बाजूला झेंडूसारखी सापळा पिके लावली तर रोग-किडी त्या सापळा पिकांवर येतात आणि मुख्य पीक सुरक्षित राहतं. कामगंध सापळे शेतात लावले तर त्या सापळ्यातून मादी किडीच्या शरीरातील स्रावासारखा गंध येत असल्याने नर कीटक तिकडे आकर्षित होतो आणि अडकून मरून जातो. तीच गोष्ट शेतातल्या पक्षीथांब्यांची. तिथं निर-निराळे पक्षी येतात आणि त्यांचे अन्न असलेल्या किटकांना खाऊन टाकतात. दुसरी एक पध्दत म्हणजे ज्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे तिची शत्रूकीड ओळखून तिची पैदास वाढवायची. `कृषी रसायने व कीड व्यवस्थापन` या विषयाचे अभ्यासक मंदार मुंडले याबाबतचा एक बोलका अनुभव सांगतात, ``महाराष्ट्रात डिसेंबर २०१० मध्ये पपईवर पहिल्यांदाच पॅराकोकस मार्जिनॅटस मिलिबगची नोंद झाली. ही कीड याआधी कधीच पपईवर आलेली नसल्याने नियंत्रण करण्यासाठी औषधच उपलब्ध नव्हतं. परंतु पुणे जिल्ह्यातील लोणीकंदच्या दत्तात्रय कंद या शेतक-यानं मिलिबगच्या शत्रूकिडीचा वापर करून मिलिबगचा बंदोबस्त केला. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं मग या शत्रूकिडीची मोठ्या प्रमाणावर पैदास करून ती पपईच्या बागांमध्ये सोडली आणि मिलिबगचं संकट दूर झाल.`` 

निसर्गातील तत्त्वं तारतम्याने वापरून शेतीला पर्यावरणस्नेही करणं शक्य आहे. महाराष्ट्र आणि देशभरातील लाखो शेतकरी आपल्या शेतावरच्या प्रयोगशाळेत त्याचे प्रयोग करून निसर्ग-पर्यावरणाचा तोल सांभाळत शेती उत्पादनात वाढ करण्याचं मोलाचं काम करत आहेत. परंपरा आणि अनुभव यांच्या मुशीतून घडत आलेली ही लोकबुध्दी आणि आधुनिक विज्ञान यांचा सांधा नीट जुळला तर हे काम अधिक सुकर होईल हेच यातून ध्वनित होतं.

(Guest post by Ramesh Jadhav)
पूर्वप्रसिध्दी- दैनिक दिव्य मराठी http://epaperdivyamarathi.bhaskar.com/epapermain.aspx?edcode=244&eddate=6%2f5%2f2011&querypage=6

1 comment:

  1. शेतीव्यवसायाचे मुख्य दुखणे शेतकरी नफ्यातोट्याचा विचार न करता खते व कीटकनाशके यांचा वापर करतो. त्यावर पर्यावरण स्नेही शेती हा उपाय ठरू शकेल असे वाटत नाही

    ReplyDelete